बरोबर अठ्ठावीस वर्षांपूर्वी, म्हणजे १० जुलै १९९१ रोजी, माझी श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालयात (सी. एच्. एम्.) पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तसा त्यापूर्वी १३ ऑगस्ट १९९० रोजी मी येथे तासिका तत्त्वावर रुजू झालो होतो.
१९८९ मध्ये मी एम्. ए. पूर्ण केलं. माझ्या वडलांची इच्छा मी ना. धों. महानोरांसारखं काही करावं, अशी होती. त्या काळात मी कविता लिहीत असे. त्या बर््या असाव्यात. करवीर पीठाच्या शंकराचार्यांना, कुसुमाग्रजांना, पु.लं. ना त्या आवडल्या होत्या! त्यामुळे कविता लिहाव्यात व शेती करावी अशी त्यांची इच्छा होती. मी तशी सुरुवातही केली होती. आमच्या अनंताकाका जोशीने मला प्रोत्साहन दिलं होतं. लाखरंग नावाच्या कर्जतजवळच्या गावी विसुभाऊकाकांनी एक घर बांधलं होतं, ते व मोठी काकू तिथं राहात होते. मी तिथं जाऊन अभ्यास करायचो. काकूच्या पुढाकारानं एका संध्याकाळी अनंताकाकानं मला तिथल्या अंगणात काही धडे दिले. नंतर माझा मामेभाऊ, अभिनेता यतीन कार्येकर, व मी मशरूम फार्मिंग करायचा प्लॅन केला, आम्ही तळ्यातल्या मत्स्यशेतीचाही प्लॅन केला. त्यानंतर १९९०च्या एप्रिल किंवा मे महिन्यात मी विद्यापीठात चक्कर मारली, तेव्हा मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी असणारी अलका शिवलकर (आता मटकर) भेटली. मी काय करतो, हे तिला कळलं, ती वैतागली. पण तिच्या स्वभावानुसार ती काही बोलली नाही. तिनं ती. डॉ. सरोजिनीबाईंच्या कानावर घातलं असावं. मी बाईंचा मानसपुत्र म्हणून माझे वर्गमित्र चिडवायचे. (अर्थात या मानासाठी मी नालायक होतो.) पण बाईंचं व ती. डॉ. उषा माधव देशमुख (देशमुख बाईंचं नाव असं आख्खंच तोंडी येतं, त्याचं एक कारण असावं त्यातील अक्षरांचा २-३-४ हा क्रम) बोलणं झालं असणार. त्यानंतर काही दिवसांनी माझी मैत्रीण सीमू शिंदे आणि क्रिकेट टीमचा मित्र आशिष झुंजारराव यांच्याजवळ ज्योतिका ओझरकर बाईंचा निरोप आला, नीतिनला मला भेटायला सांग. मला ओझरकर बाई खूप आवडत असत. त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांचे गुडघ्यापर्यंत लांबसडक केस, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि विषयाचं सखोल ज्ञान हे सारं प्रभावशाली होतं. मी खोपोलीच्या माझ्या महाविद्यालयातून अनेकदा बाईंचे तास ऐकायला जात असे, मी एम्. ए. ला होतो, तेव्हा त्या एम्. फिल्. करत होत्या. आमचे आवडते कवी विंदा! तो एक समान धागा होता. त्यांना भेटल्यावर, त्यांनी मला विचारलं, “सध्या काय करतो आहेस.” ‘मी शेती करतो आहे’ असं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “वेडा आहेस का? ती शिक्षकी पेशाकडे वळायला हवंस. आमच्या इथं जागा आहे, तासिका तत्त्वावर. तू शिकवायला ये.” मी एका पायावर तयार झालो. मला प्राध्यापकच व्हायचं होतं. बाबांच्या आग्रहामुळे मी शेतीकडे वळलो होतो, इतकंच. बाई म्हणाल्या, “जोशी सर जानेवारीत निवृत्त होतील, त्यानंतर तू त्या जागेसाठी मुलाखत देऊ शकतोस.” पुढे केव्हा तरी गप्पा मारताना त्यांनी मला सांगितलं, “तू शेती करायला गेलास हे सरोजिनीबाईंना व उषा बाईंना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांना तुला मनातून प्राध्यापकीकडे जायचं आहे, हे माहीत होतं.” वसईच्या कोमसाप साहित्य संमेलनात उषा बाईंनी ओझरकर बाईंना सांगितलं, की “तू नीतिन आरेकरला ओळखतेस का?” बाईंनी तो माझाच विद्यार्थी आहे, असं उत्तर दिलं. उषाबाईंनी माझ्या नावाची शिफारस ओझरकर बाईंना केली होती.
अशा पद्धतीनं मी सी एच् एम् मध्ये आलो. माझी मुलाखतही एकदम भारी झाली. प्राचार्य तलरेजा यांच्या केबिनमध्ये आमचे विभागप्रमुख प्रा. श्रीहरि जोशी घेऊन गेले, त्यांना म्हणाले, “या मुलाला आपण मराठीचे तास देतोय.” तलरेजा सरांनी माझ्याकडे आरपार पाहिलं. माझं काटकुळं शरीर, एकूण ४५ किलो वजनाचा देह पाहून ते फारसे प्रभावित झाले नाहीत, पण जोशी सरांना ते म्हणाले, “लेक्चर दे रहा हूँ का मतलब क्या है? मेरे सामने कुछ सवाल तो पुछो।“ सरांना माझी नाटकाची आवड माहीत होती. त्यांनी मला अॅरिस्टॉटल, शेक्स्पीअर, इब्सेन यांच्याबद्दल, खानोलकरांच्या नाटकाबद्दल विचारलं. मी काही तरी बोलत राहिलो. तलरेजा सर ऐकत होते. त्यांना मराठी कळत होतं. त्यात शेक्स्पीअरबद्दल त्यांना प्रेम होतंच. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. मला भराभरा बोलताना ऐकून त्यांनी कपाळावरच्या आठ्या काढल्या. मला दुसर््या दिवसापासून यायला सांगितलं.
जोशी सर मला घेऊन खाली स्टाफ रूममध्ये गेले. आम्हाला स्वतंत्र कार्यालय नव्हतं. स्टाफ रूममध्ये आतल्या बाजूला एक खोली होती. त्या खोलीत एक टेबल, चार खुर्च्या, दोन सोफे होते. त्यातल्या एका सोफ्यावर पाय पसरून व भिंतीला टेकून हिंदी चित्रपट अभिनेता इफ्तिकारसारखे दिसणारे वयस्कर व देखणे प्राध्यापक मन लावून ‘राज्यशास्त्रा’चं पुस्तक वाचत बसले होते. जोशी सरांनी माझी व त्यांची ओळख करून दिली. ते प्रा. एच्. सी. मेहता होते. बापरे! राज्यशास्त्रावरची त्यांची पुस्तकं मी ऐकून होतो. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. ते एकदम गहिवरले. समोरच्या खुर्चीत एक उंचच उंच, सावळ्या रंगाचे, लांबोडक्या नाकाचे, काळ्या जाड काड्यांचा चष्मा घालणारे प्राध्यापक बसले होते, लहानपणी वाचलेल्या वेताळ (फँटम) कथांतील वेताळासारखे ते दिसत होते. जोशी सरांनी माझी ओळख करून दिली, ते इंग्रजीचे विभागप्रमुख यादव सर होते. जोशी सरांनी अधिकची माहिती दिली, “तू हिंदी वाचतोस ना? हिंदीतले अजातशत्रु माहिती आहेत का?” मला ते नाव माहिती होतं. मी मान हलवताच सर म्हणाले, “हे अजातशत्रु!” मी हैराण झालो. कारण महाविद्यालयातील पहिल्याच दिवशी साहित्य क्षेत्रातील तीन मोठी नावं मला भेटली. मेहता, अजातशत्रु आणि जोशी सर! श्रीहरि जोशी म्हणजे मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक. आज मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकजण त्यांच्या तालमीत तयार झालेले. मगरकर, संजय जाधव, नरेश गोरे, उदय सबनीस ही काही नावं. ‘अश्वत्थाच्या वाटेवर’सारखं महत्त्वाचं प्रायोगिक नाटक लिहिणारे जोशी सर. मला ते त्या दिवशी प्रथमत:च भेटले होते. (मी फक्त ओझरकर बाईंच्या तासाला बसायचो, जोशी सरांबद्दल ऐकून होतो, पण त्या दिवसापर्यंत माझी व त्यांची भेट नव्हती) त्यांचं वागणं, बोलणं इतकं ममत्वपूर्ण होतं की, बस! सरांनी ओझरकर बाईंना सांगितलं, “याला विषय वाटून द्या.” सरांनी शिकवण्यापलिकडे मराठी विभागात लक्ष घालणं बंद केलं होतं, काही महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. त्यामुळे बाईंवर त्यांनी सर्व निर्णय सोपवले होते. बाईंनी मला विचारलं, “तू कोणते विषय शिकवणार आहेस?” एकूण पाच तास होते. मी म्हणालो, “मला काव्यशास्त्र शिकवायला आवडेल.” बाईंनी सरांकडे पाहिलं. सरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण तो विषय त्यांच्याकडे होता. साधारणत: एक पद्धत असते की ‘काव्यशास्त्र’ आणि ‘वाङ्मयेतिहास’ हे विषय ज्येष्ठ प्राध्यापकाने शिकवायचे. बाईंनी तो विषय मला देऊन टाकला. एक तास मला द्वितीय वर्षाचा दिला. माझं वर्कलोड देऊन झालं. बाईंनी मला विचारलं, “लगेच तास घेणारेस का?” मी बिनधास्तपणे “हो” म्हणालो.
तो द्वितीय वर्षाचा तास होता. साधारणपणे एक तासाचा अवधी मला मिळणार होता. इंदिरा संतांचा ‘मृगजळ’ हा कवितासंग्रह अभ्यासाला लावला होता. इंदिरा ही माझी अत्यंत आवडती कवयित्री! मी कविता निवडली ‘ऐक जरा ना!’ तीही माझी लाडकी. प्रा. गंगाधर पाटील यांनी आम्हाला ती समीक्षेच्या वर्गात शिकवली होती. ही कविता मला सतत वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत राहिली होती. मी द्वितीय वर्षात शिकत असताना मला अभ्यासाला होती, एम्. ए. ला असताना ‘उपयोजित समीक्षे’साठी होती. माझा वर्गमित्र आनंद थत्ते यानं आदिबंधात्मक समीक्षा करण्यासाठी ‘थेंबाथेंबी’ ह्या शीर्षकाची कविता निवडली होती व तिची आदर्श अशी आदिबंधात्मक समीक्षा केली होती. ती मला मुखोद्गत होती. मी विचार केला या दोन कविता निवडून त्यावर बोलू या.
तासाची वेळ झाली, तशा ओझरकर बाई मला वर्गाकडे घेऊन गेल्या. वर्ग मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला होता. आज तिला आम्ही अॅनेक्स बिल्डिंग म्हणतो. पत्र्याची शेड असलेले, नंतर बांधकाम केलेले वर्ग होते ते. आज जी-१२, असा खोली क्रमांक असलेला व तेव्हा द्वितीय वर्ष, कला अशा नावाने ओळखल्या जाणार््यार वर्गात बाई घेऊन गेल्या. त्या वर्गात मी बारावी शास्त्र शाखेत असताना शेवटचा तास बसलो होतो. तो शेवटचा तास गणिताचा होता, शहानी नावाचे जाडजूड सर तो तास घेत होते. मी त्या वर्षी बारावी शास्त्र शाखेच्या परिक्षेत गणित विषयात १४ गुण मिळवून नापास झालो होतो. दैवाची गंमत पाहा, ज्या वर्गातून नापास होऊन मी बाहेर पडलो होतो, त्याच वर्गात मी माझा पहिला तास घेणार होतो. बाईंनी माझी ओळख करून दिली. ‘माझा विद्यार्थी आहे,’ असं त्या म्हणाल्या व वर्गाबाहेर गेल्या. मी १३ ऑगस्ट १९९० रोजी सी एच् एम् मध्ये शिकवायला सुरुवात केली ती आजतागायत! कधी अडलो नाही, कधी थांबलो नाही, कधी अडखळलो नाही. याचं कारण माझ्या आई-बाबांचा आशीर्वाद. माझी आई ही भारतातील हिंदी विषयाची पहिली प्राध्यापिका, १९५७ साली ती प्राध्यापिका झाली, तिची नियुक्तीच प्राध्यापक पदावर झाली होती. आमच्या क्षेत्रात सर्वांना प्राध्यापक म्हणण्याचा प्रघात आहे. पण प्राध्यापक हे पद आहे, तिथं पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तिच्याकडे तिचे विद्यार्थी येत असत, तिला जो मान देत असत, तो पाहूनच माझ्या मनात शिक्षकी पेशाकडे जायचं आलं होतं. तिच्या विद्यार्थ्यांत महत्त्वाचे विद्यार्थी म्हणजे अशोकजी परांजपे, सुधीर मोघे. ज्यांची गाणी ऐकत मी लहानाचा मोठा झालो, ते कवी घरी आईला भेटायला येतात, त्यांना पाहून आईचा ऊर अभिमानानं भरून येई, हे पाहून छान वाटायचं. असं वाटायचं, आपलेही विद्यार्थी असतील, ते मोठ्ठे होतील, आपल्याला भेटायला येतील, मग आपल्याला किती अभिमानाचं वाटेल!! आता जेव्हा विमुक्ता फडणीस- सुजाता दुर्वे- प्रतिभा टेम्बे- कविता पोतले – अनुया गरवारे – नेहा गुरदासानी सारख्या प्राध्यापिका, भक्ती नातूसारखी शिक्षणाधिकारी, शलाका जांभळेसारखी न्यायाधीश, दिलीप शिंदे – सुवर्णा दुसाने – अमेय तिरोडकरसारखे पत्रकार, शिवाजी रगडेसारखे सामाजिक कार्यकर्ते, मनोज देसाई – भूपाल पणशीकर – रूपाली पवार – उन्मेषा पुराणिक – वैशाली साळवे- सचिन मुळ्ये – पीयूष मेहरोलिया – निषाद जोशी – राहुल चसवाल –स्वप्नाली कुलकर्णी – पटवर्धन बहिणी- तेजल पटवर्धन – व्हियान फर्नांडिस – सनीश नायर – मेगन फर्नांडिस – जनार्दन धात्रक यांच्यासारखे गायक गायिका विद्यार्थी, सौरभ पैठणकर – विवेक भागवत – सिद्धार्थ दोंदे – प्रसाद कुलकर्णी – स्वप्नील गानू- मंदार जोशीसारखे तबलावादक, मोहित शास्त्रीसारखा बासरी वादक, प्रवीण नायरसारखा संगीतकार, पल्लवी आठल्ये (ही माझी थेट विद्यार्थिनी नव्हती, पण मवामंची सदस्य होती) – जुई गडकरी – प्रमोद पवार –सुहास बनसोडे – प्रजित शिंदे – अभिजित पवार – अतुल आगलावे – पूर्वा कौशिक – स्नेहा साळवी – विपुल काळे – गौरव मालणकर – श्रीकांत भगत यांच्यासारखे अभिनेता –अभिनेत्री, वल्लभ भिंगार्डेसारखा व्हॉईस ओव्हर तज्ज्ञ व डबिंग आर्टिस्ट, दीपा नायर – नेत्रा सहस्रबुद्धे – आदिती भडसावळे – कीर्ति मेहरोत्रा – परेश शिरोडकर – कार्तिक अय्यर – रमेश कोळी- विनायक सैद – अनिल नायर – प्रणिता महाजनसारखे नृत्य कलावंत जेव्हा भेटतात तेव्हा मला माझ्या आईला वाटत असे, तसाच अभिमान वाटतो या मुलांचा. (इथं आलेली नावं ही पटकन आठवलेली नावं आहेत, अजूनही खूप विद्यार्थी आहेत, ज्यांची नावं इथं यायला हवी आहेत.) या मुलांनी शिक्षक म्हणून माझं आयुष्य समृद्ध केलं आहे.
थोडं विषयांतर झालं, पण ते हवंहवंसं वाटणारं विषयांतर आहे.
माझा तास संपल्यावर मला जाणवलं, की होय! मला हेच करायचं आहे.
सी एच् एम् मधला माझा पहिला मित्र झाला तो विवेक काळे. आमच्या कर्जतची प्रा. मधु (माधवी) नाटेकर- ठाकूरदेसाई ही माझ्या मित्राची बहीण. तिनं बिर्ला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी घेतली होती. विवेक तिचा मित्र. तिनं मला विवेकला भेटायला सांगितलं. विवेकला भेटलो, तर त्याच्याबरोबर मिलिंद वैद्य (ही वैद्य-काळे जोडी होती). वैद्य सर मला चटकन आठवले. त्यांच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी होतो. हे त्यांना मी नंतर सांगितलं. ओझरकर बाईंनी माझी आवर्जून गाठ घालून दिली ती जिमखान्याचे सर श्रीराम पवार यांच्याशी. त्याची माझी चटकन गट्टी जमली. आम्ही लगेच एकेरीत गप्पा मारू लागलो. कॉलेजच्या जिमखान्यात मी आपसूक शिरलो. गेली अठ्ठावीस- एकोणतीस वर्षे मी जिमखाना समितीत असेन वा नसेन, जिमखान्याच्या प्रत्येक कार्यक्रमात, स्पर्धेला मी असतोच. खेळ हे माझं वाचनानंतरचे दुसरे पॅशन आहे. त्यानंतर पवारने मला क्रिकेटचे कोचिंग करायला सांगितले. आशिष झुंजारराव हा कर्जतचा व माझ्या क्रिकेट टीमचा सदस्य, तो कॉलेजचा उत्तम फलंदाज होता, मला वाटतं तो कॅप्टनही होता. मी कोचिंग करू लागलो. त्यावेळी एक गंमत झाली. त्या काळात प्रश्नपत्रिका काढायला लागायच्या त्या स्टेन्सिलवर! ओझरकर बाईंनी मला परीक्षा खोलीत जाऊन मराठीच्या प्रश्नपत्रिकेची स्टेन्सिल कट करायला सांगितली. मी क्रिकेटच्या मैदानातून थेट परीक्षा खोलीत गेलो. अंगात ट्रॅक सूट होता. परीक्षेतील कर्मचारी वासू हा मला आता घेईना. मला म्हणू लागला- “विद्यार्थ्यांना आत येण्यास मनाई आहे.” मी समजावून सांगितलं, तर त्याला मस्करी वाटली. शेवटी मी बाजूच्या वर्गातून बाईंना बोलावलं तेव्हा वासूला कळलं की मी मराठीचा नवा शिक्षक आहे. नंतर त्याची व माझी कायमची दोस्ती झाली.
आमचं मराठी वाङ्मय मंडळ (मवामं) ही जोरदार संस्था होती व आजही तितकीच जोरदार आहे. सोनी टीव्ही (सेट) किंवा कलर्स टीव्हीला सेट करून देणारा संजय उपाध्याय हा आमच्या सी एच् एम् चा! तो नितीन देसाईंच्या येथे मला अनेक वर्षांनी भेटला, तेव्हा त्यानं मवामंची आठवण काढली, इतकं ते कॉलेजमधलं महत्त्वाचं मंडळ आहे. मवामंच्या एका कार्यक्रमासाठी टेबलावरील चादरीला लावण्यासाठी मला टाचण्या हव्या होत्या. ओझरकर बाई मला म्हणाल्या, जा ऑफिसमधून रजिस्ट्रारकडून टाचण्या घेऊन ये. मी रजिस्ट्रारकडे गेलो, तर त्यांनी मला दहा टाचण्या हव्या आहेत असं लिहून दे, असं सांगितलं. मी लिहून दिलं. बाईंना हे सांगितलं. कार्यक्रम झाला. बाई म्हणाल्या रजिस्ट्रार मॅडमना ह्या दहा टाचण्या मोजून दे, व त्या मिळाल्या म्हणून लिहून आण. मी रजिस्ट्रारकडे गेलो. दहा टाचण्या दिल्या व त्या परत मिळाल्या असं मला लिहून द्या असं सांगितलं. त्या मला म्हणाल्या असं कोणी लिहून देतं का? मी ठीक आहे, असं म्हणून मागे वळलो. तर बाई उभ्या- लता, इसे लिखकर देना की पिन तुम्हे वापस मिली है। जैसे लिखकर मांगा वैसेही लिखकर वापस करो. बस. बाईंनी त्यांना लिहायला लावलं, मग शांत झाल्या. मला एक धडा मिळाला, न मागता!
माझा आवाज चांगला होता तेव्हा. जिमखाना समितीचे प्रमुख प्रेमकुमार सर हे पारितोषिक वितरण समितीचेही अध्यक्ष असत. पवारने त्यांना सांगितलं की हा नवा मुलगा बोलतो चांगला, सरांनी मला थेट मुख्य पारितोषिक वितरण समारंभाचे निवेदन करायला सांगितले. (१९९० ते २०१६ अशी सव्वीस वर्षे मी मुख्य पारितोषिक वितरण समारंभाचे निवेदन करत असे.) यामुळे मला व्यवस्थापनातील बहुतेकजण ओळखू लागले. व्यवस्थापन समितीतील अॅड. नारी गुरसहानी हे माझ्या बाबांचे मित्र. त्यांचा व माझा वाढदिवस एकाच दिवशी असे. आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असू. त्यांना मी सांगितलं नव्हतं की मी सी एच् एम् मध्ये मराठी शिकवतो. ते आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. नंतर एका कार्यक्रमाच्या वेळी मला पाहून त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. त्यांनी तलरेजा सरांना सांगितलं, हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. पण, तोवर माझी नोकरी पक्की झालेली होती. (अपूर्ण.)